Chandrashekhar Bawankule : ‘या’ सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासनाला कामाला लावले आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासनाला कामाला लावले आहे. दुष्काळ निवारणाचे काम करणाऱ्या महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा, वीज, पशुसंवर्धन आणि जलसंपदा विभागांसह ११ विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेशही काढले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
हिंगोली जिल्ह्यातील आराटी येथे पिकांची पाहणी केल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सुमारे ७५ टक्के भाग दुष्काळाच्या परिस्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला. सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून कापूस आणि इतर पिकांनाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कापसाचे पीक वरून हिरवे दिसत असले तरी पाते आणि बोंडांची स्थिती समाधानकारक नसल्याचेही त्यांनी नमूद केले. (Chandrashekhar Bawankule)
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती काम करत आहे. राज्यातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. विमा आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार उपलब्ध होणाऱ्या मदतीचा विचार केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीचा निर्णय
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत असली तरी संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावात उपस्थित राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
काँग्रेसकडून बावनकुळेंचा ताफा अडवला
दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी बावनकुळे कार्यालयातून जात असताना आंदोलकांनी त्यांचा ताफा काही काळ अडवला. त्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले. (Chandrashekhar Bawankule)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत कधी आणि किती मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे. सरकारकडून नुकसानीचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल आल्यानंतर मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. (Chandrashekhar Bawankule)






