Weather update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट! वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अवकाळीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
Weather update : सध्या महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंगावत असून, उन्हामुळे जीवाची काहिली होत असतानाच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather update : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल दिसून येत असून 19 एप्रिल रोजी राज्यात दुहेरी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव जाणवणार आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात उष्णतेचा तडाखा
विदर्भात मात्र उष्णतेचा तडाखा वाढणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवणार आहे.
एकूणच, राज्यात एकाच दिवशी पाऊस आणि उष्णता असे दोन्ही प्रकारचे हवामान अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, तर शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
अवकाळीचे कारण काय?
प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे ‘अल निनो’ची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन तापमानात मोठी वाढ होते. याउलट समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाल्यास ‘अल निनो’चा प्रभाव दिसून येतो. यामुळे कडाक्याची थंडी आणि अधिक पावसाची स्थिती निर्माण होत असते.
तीन दिवस महत्वाचे
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र म्हणजे प्रामुख्याने घाट परिसरात खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 19 ते 22 एप्रिलदरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





