Maharashtra drought : महाराष्ट्रात दुष्काळ कधी जाहीर करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ तारीख
Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीवर सरकारची मोठी घोषणा. शनिवारीपूर्वी दुष्काळाबाबत पहिली अधिसूचना काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra drought : राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळाबाबत सरकारकडून महत्त्वाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांबाबतची पहिली अधिसूचना शनिवारीपूर्वी (दि. 26) काढण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले की, दुष्काळाबाबत प्राथमिक माहिती आणि आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. त्याआधारे कोणत्या भागात दुष्काळाची स्थिती आहे आणि तेथे कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत अधिसूचना काढली जाईल. त्यानंतरही उपलब्ध होणाऱ्या नव्या माहितीच्या आधारे आवश्यक बदल करता येतील.
दरम्यान, शेतातील परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश भागांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांवर मोठा परिणाम झाला असून, कोकणातील भात तसेच ज्वारीलाही फटका बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाण्याचे नियोजनही करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra drought)
Mumbai: Maharashtra CM Devendra Fadnavis says, “Looking at the drought situation in the state, drinking water arrangements will be made. Local bodies have been directed to make adequate arrangements for drinking water. A committee, led by Minister Chandrashekhar Bawankule, has been formed to tackle the drought. Policy decisions over drought will be made by the CM as well as both Deputy CMs. Aid will be sought from the Centre too, but we will not wait for their aid. State Govt will make all necessary decisions as per the situation.”
— ANI (@ANI) September 22, 2026
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शेतातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना करणार असून, तक्रारी सोडवण्याचे कामही करणार आहे. समितीला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस स्वतः काही भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच मंत्री आणि आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra drought)





