Satara : सप्टेंबर महिन्यातही दुष्काळाच्या झळा; माण, खटावमधील ४२ गावे, २८० वाड्यांना अद्याप टँकरने पाणी
Satara सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप या दोन तालुक्यांतील काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाची दाहकता वाढण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे.

Satara : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरी माण व खटाव तालुक्यातील ४२ गावे व २८० वाड्यांना अद्यापही टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. १६ विहिरी व ९ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने टंचाईची परिस्थितीचा धोका वाटत होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विशेषत पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरील पाणी टंचाईची समस्या काही प्रमाणात आटोक्यात आली होती. मात्र, माण आणि खटाव तालुक्यांत अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यातही अशीच परिस्थिती राहिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
माण तालुक्यात ३५ गावे व २४४ वाड्यांमध्ये खासगी ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ५७ हजार २५९ लाेकसंख्या व ५१ हजार ७८४ पशुधन अवलंबून आहे. खटाव तालुक्यात ७ गावे व ३६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून ७ हजार ८३३ लाेकसंख्या व २ हजार १३५ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप या दोन तालुक्यांतील काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाची दाहकता वाढण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे.





