मुंबई – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशामध्ये दसऱ्यानिमित्त राज्यात 6 मेळावे होणार असून अनेकांचे याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीआधी कोण काय बोलणार? तसेच कोण कोणावर काय टीका करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या आरक्षणावरून राजकारण तापले आहे. अशामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जाणार आहे. तर मुंबईत दोन दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रथा पुढे घेऊन जात उद्धव ठाकरे हेदेखील मुंबईत दसरा मेळावा घेणार आहेत. तर दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दसरा मेळावा घेऊ लागले. त्यामुळे यंदाच्या वर्षी ते दसरा मेळाव्यात काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. दसरा हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. पण यंदाचा दसरा हा खास असणार आहे, कारण आगामी विधानसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणारी आचारसंहिता यामुळे अनेक नेत्यांसाठी दसरा मेळावा ही एक मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दसऱ्याला 6 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी मुंबईत दोन दसरा मेळावा, कोल्हापुरामध्ये शाही दसरा सोहळा, नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, तसेच पाथर्डी तालुक्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा आणि बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील काही नेत्यांना घेऊन बाहेर पडले. तसेच, भाजपसोबत युती करून त्यांनी सत्तास्थापन केली. यावेळी या पक्षफूटीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आणि त्यांना ते मिळालेही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे दसरा मेळावा घेण्याची प्रथा सुरूच ठेवली. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीदेखील परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेण्याची प्रथा सुरू ठेवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगणार आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांवर काय टीका करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.