मुंबई : मुंबईतील नेस्को सेंटर येथे शिवसेना (शिंदे गट) च्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. आपण लोकांसाठी काम करणारा माणूस असल्याचा दावा करताना शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा वाचला. यासोबतच, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना देताना त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली, जी शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करणारी ठरेल. शिंदेंची मोठी घोषणा आपल्या भाषणात शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, शेती वाहून गेली, पशुधन गमावले. अशा परिस्थितीत सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.” यावेळी त्यांनी शिवसेनेतर्फे एक मोठी घोषणा केली. “अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांतील ज्या मुला-मुलींची लग्ने ठरली असतील, ती सर्व लग्ने शिवसेना पक्षातर्फे लावून देईल. या लग्नांची पूर्ण जबाबदारी आमची आहे. मी स्वतः ही बांधिलकी जाहीरपणे स्वीकारतो. माझे दोन हात रिकामे नाहीत.” या घोषणेने उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला, तर शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “आता एकच लक्ष्य समोर ठेवा – स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे. आपापसातील सर्व मतभेद विसरून कामाला लागा. निवडणुका आपल्यासाठी नवीन नाहीत.” त्यांनी शिवसैनिकांना जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या. बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष आणि शेतकऱ्यांना मदत पुढील वर्ष, म्हणजेच २०२६, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे सांगत शिंदे यांनी ते मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल, असे जाहीर केले. यासोबतच, शेतकऱ्यांच्या संकटावर बोलताना ते म्हणाले, “बळीराजाचे अश्रू पुसण्याचे काम शिवसेना करेल. जिथे-जिथे शक्य असेल तिथे शिवसैनिकांनी मदत करावी.” उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून, त्यात शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाकरेंवर टीका आणि बंडाचे समर्थन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना आपल्या २०२२ च्या बंडखोरीचे समर्थन केले. ते म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढलो. आमचा निर्णय योग्य होता, आणि बाळासाहेब असते तर त्यांनी आमच्या खांद्यावर थाप मारली असती.” या भाषणाने शिंदे यांनी आपल्या गटाची भूमिका ठामपणे मांडत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.