Pankaja Munde | मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे येथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त पाहणी करत मदतही केली आहे. अनेक जण शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे. यातच आता पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही दसरा मेळाव्याच्या निमित्ताने समर्थकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त आपल्या समर्थकांना आवाहन करताना मेळाव्याला येताना गव्हाचे पीठ, चणाडाळ आणि गूळ घेऊन येण्यास सांगितले आहे. “महापुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. सरकारकडून पूरग्रस्तांना मदत केली जात असली तरी अनेक घरांमध्ये चूल पेटणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक घरात दसऱ्याच्या दिवशी गोडधोड होणार नाही. अशा आपल्या पूरग्रस्त बांधवांना या दसऱ्याच्या दिवशी गोडधोड खाता यावे यासाठी मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येकाने गुळ, गव्हाचे पीठ आणि चणाडाळ सोबत आणून भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावे. हा प्रसाद प्रत्येक गावात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे,” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. Pankaja Munde | परंपरा खंडित होऊ देणार नाही “यंदाचा आपला दसरा मेळावा म्हणजे मेळावा नाही, सभा किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, त्यानंतर मुंडे साहेबांनी त्या परंपरेला उंचीवर नेलं. मी भगवान बाबांच्या दर्शनासाठी येत आहे, भगवान बाबांच्या चरणी, त्यांची पूजा करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येत आहे. आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही.” माझ्या भाषणाने तुम्हाला ऊर्जा मिळते तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते. तुमच्या विराट रुपाचे दर्शन होते, वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा या मेळाव्यातून मिळते. माझा दसरा मेळावा साधाच असतो, अठरापगड जाती धर्माचा संगम असलेली ही परंपरा आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात यंदा ज्यांच्या घरात चूल पेटू शकत नाही, दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी खाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण पुढे या,’ असे पंकजा मुंडे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. Pankaja Munde | हेही वाचा: राजकारणात खळबळ! आमदार महेंद्र दळवींचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप; म्हणाले “तटकरे ब्लॅकमेलिंग…”