Maharashtra Cyclone Alert : राज्यावर दुहेरी चक्रीवादळाचे संकट! पुढील काही तास धोक्याचे, IMD चा गंभीर इशारा

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा ताप कायम असताना, गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पडला आहे. आता राज्यावर दुहेरी चक्रीवादळाचे सावट आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत वादळाची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात खोलवर वादळ घोंगावत असून, बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाले आहे. हे वादळ 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर, मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे.
यामुळे आंध्र प्रदेशातील काकीनाडा, पूर्व गोदावरी, कोनासीमा, एलुरु आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून, किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही या वादळाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 28 ऑक्टोबरसाठी विदर्भ-मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातील काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.





