Maharashtra Assembly Election 2024 : कोण असेल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? शपथविधी रखडला

Maharashtra Assembly Election 2024 – अभूतपूर्व यश मिळवून महाराष्ट्राची सत्ता राखल्यानंतरही महायुतीला अद्याप नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मुहूर्त मिळालेला नाही. त्यातून मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाल्याने शपथविधी रखडल्याचे मानले जाऊ लागले आहे. आता महाराष्ट्रातील पेचावर दिल्लीतून तोडगा काढला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाविजय मिळवणारी महायुती तातडीने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करेल असे मानले जात होते. प्रत्यक्षात निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही सरकार स्थापनेविषयी सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी कधी होणार याविषयी महायुतीच्या गोटातून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे नव्या सरकारच्या रचनेबाबत आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री निवडीविषयी महायुतीचं ठरायचं असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. महायुतीमधील प्रत्येक पक्षाला आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असल्याने पेचाची स्थिती उद्भवल्याचे समजते.
महायुतीने चेहरा जाहीर करण्याचे टाळून विधानसभा निवडणूक लढवली. निकालानंतर सर्व घटक पक्ष एकत्रितपणे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील असे निवडणूक काळात सांगितले गेले. आता निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांची मुख्यमंत्रिपदाविषयीची आकांक्षा उघड झाली आहे.
संख्याबळाचा विचार करता महायुतीच्या यशात भाजपचा वाटा अतिशय मोठा ठरला आहे. त्यामुळे मावळत्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रही सूर भाजपमधून उमटू लागला आहे.
तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवल्याकडे शिंदेसेना लक्ष वेधत आहे. त्यातून शिंदे यांना कायम ठेवले जाण्याची मागणी त्यांच्या पक्षातून पुढे आली आहे. त्याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता राज्याची सुत्रे सोपवली जावीत, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बोलून दाखवत आहेत.





