पुणे – शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या कसबा विधानसभा मतदार संघात या वेळी २६८ मतदान केंद्र आहेत. त्यातील काही ठिकाणे ही वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यात आली आहेत. याद्वारे प्रामुख्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात प्रामुख्याने अहिल्यादेवी शाळेमध्ये “पिंक पोलीस स्टेशन’ बनवण्यात आले आहे.
येथे महिला कर्मचारीच कार्यरत असणार आहेत. तर, हिरालाल शाळेजवळ असलेल्या हेरिटेज वास्तूमध्ये एक मतदान केंद्र आहे. या वास्तूला अनेक वर्षांचा इतिहास आहे. ही जागा प्रार्थना समाजाची आहे. यासोबतच सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे बुथ हे युथ केंद्र असणार आहे. तेथे कार्यरत असणारे सर्व कर्मचारी युवा वर्गातील असतील. तर, याच महाविद्यालयाच्या मागे असलेल्या दिव्यांग शाळेमध्ये दिव्यांग मतदारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे कार्यरत असणारे कर्मचारीही दिव्यांगच असणार आहेत.
ब्रेल लिपितही मतदार चिठ्ठी –
अंथरूणाला खिळून असलेले तसेच मतदान केंद्रावर पोहोचू न शकणारे दिव्यांग अशी १९७ जणांची यादी कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन नियमांचे पालन करून मतदान घेतले जाणार आहे. नेत्रहीन असलेल्या मतदारांना वोटर इन्फर्मेशन स्लीप ही ब्रेल लिपीत दिली जाणार आहे. अशी १०८ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
पाळणाघराची सुविधा –
मतदानासाठी लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांच्या बाळांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे आशा वर्कर्सची मदत घेतली जाणार आहे. या शिवाय गर्भवती, वृद्ध, कडेवर मूल असलेल्या महिलांसाठीही मतदान सुसह्य व्हावे, रांगेत फार काळ उभे रहावे लागू नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारांनी आधीच केंद्र पाहून ठेवावे –
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेबसाइटमध्ये आपले नाव मतदार यादीत आहे का ते पहावे. कसबा विधानसभा क्षेत्रातील पाच ठिकाणे बदलली आहेत. त्याचे जाहीर प्रकटनही वृत्तपत्रातून दिल्याचे देवकाते यांनी सांगितले. यामध्ये गणेशपेठ भागातील केंद्रांचा समावेश आहे.