कोथरूड विधानसभा मतदारसंघ: चंद्रकांत मोकाटे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा प्रतिसाद

पुणे – घरातल्या माणसाच्या आम्ही पाठीशी आहोत…लहानपणापासून पाहतो तुमच्यातील जिद्द तीच आहे…काका आता विकासाला गती देण्याची वेळ आली…अशा प्रतिक्रिया कर्वेनगर येथे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना आल्या. ही निवडणूक माझ्या एकट्याची नाही तर तुम्हा सर्वांची असून, तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल, असा विश्वासही मोकाटे यांनी व्यक्त केला.
वारजे जकातनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार अर्पण करून कर्वेनगर परिसरातील पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, शहर अध्यक्ष स्वप्निल दुधाने, विजय खळदकर, जगदीश दिघे, नंदू घाटे, वैशाली दिघे, पल्लवी नागपुरे, गोविंद थरकुडे, अॅड. शिवाजी भोईटे यासह पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले. यावेळी गावकऱ्यांसह नागरिकांच्या गाठी-भेटी घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आपलेपणातून ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. यावेळी काही महिलांनी वाढती महागाई, बेरोजगारी यासह विविध समस्यांचा पाढा वाचला.
भाजीपाला घ्यायला गेलो, तर ८० ते १०० रुपये किलो दराने विकला जातो. मात्र, त्याच तुलनेत शेतकऱ्याला भाव मिळत नाही. धान्याच्या किंमतीही वाढल्या, असा परिस्थितीत कुटुंबांचा गाढा चालवायचा अशी व्यथा महिलांनी मोकाटे यांच्याकडे मांडली. नेतेमंडळी महागाईवर बोलण्यापेक्षा एकमेकांवर टीका करत आहेत. या वर “शिवसेना-महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम महागाई आटोक्यात आणण्यासाठी पाठपुरावा करू,’ असे अश्वासन मोकाटे यांनी दिले.





