Maharashtra Assembly Election 2024 : एबी फॉर्म जोडूनही उमेदवार ठरला अपक्ष…

Maharashtra Assembly Election 2024 (Hingoli) – वंचित बहुजन आघाडीकडून दोघांनी एबी फॉर्मसह हिंगोलीत अर्ज दाखल केले होते. छाननीत सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरवून दुसऱ्या उमेदवाराचा 37 मिनिटांनी आलेला अर्ज अपक्ष धरण्यात आला. त्यामुळे एबीफॉर्म आणल्यानंतरही इच्छुक उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात वंचित कडून प्रकाश थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे. माजी नगरसेवक जावेद राज यांनीही वंचित व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांकडेही एबीफॉर्म होता. माजी नगरसेवक जावेद राज व प्रकाश थोरात यांच्या एबी फाॅर्मवर आक्षेप नोंदवला. मात्र थोरात यांनी 2 वाजून 22 मिनिटांनी, तर जावेद राजयांनी 2 वाजून 59 मिनिटांनी अर्ज दाखल केला होता. सर्वप्रथम आलेला एबी फॉर्म वैध ठरवण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 995 उमेदवार मैदानात आहेत.





