Maharashtra Politics : महविकास आघाडीत मोठी फूट? ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा, काँग्रेस मैदानात
Maharashtra Politics : बारामती पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर केला आहे.

Maharashtra Politics : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत भाजपची ही जागा बिनविरोध जावी, असा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने आता लढत रंगणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पाठिंब्याची विनंती केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने आघाडीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





