महाकुंभ मेळ्यात बॉम्ब असल्याच्या सूचनेने खळबळ, जिल्ह्यात कलम 163 लागू

Mahakumbh Mela 2025: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सध्या सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातून कोट्यावधी भाविक कुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यातच शुक्रवारी (18 जानेवारी) अचानक कुंभमेळ्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
कुंभमेळ्याच्या सेक्टर-१८ मध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. यामध्ये सेक्टर-18 मध्ये बॉम्ब असल्याचे अनोळखी नंबरवरून सांगण्यात आले होते.
ही सूचना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून तातडीने पावले उचलण्यात आली. पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकांसह इतर टीम्स त्वरित सेक्टर-18 मध्ये दाखल झाल्या. यावेळी अधिकाऱ्यांकडून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, तपासाअंती ही माहिती खोटी असल्याचे समोर आले. ज्या नंबरवरून फोन आला होता, त्या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेंतर्गत कलम 163 लागू (आधीचे कलम 144) करण्यात आले आहे.
संपूर्ण प्रगायगराजमध्ये 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कलम 163 लागू असेल. महाकुंभ, प्रजासत्ताक दिन, महाशिवरात्री असे महत्त्वाचे दिवस असल्याने प्रयागराजमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याचा आज सहावा दिवस आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हा धार्मिक सोहळा चालेल. या कुंभमेळ्याला अनेक राजकीय नेते व व्हीआयपी व्यक्ती उपस्थित राहत आहेत. तसेच, जगभरातून जवळपास 40 कोटी नागरिक कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.





