Vaibhav Solankar : राज्यातील बहुजन समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून महाज्योतीमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (महाज्योती) मार्फत बँकिंग (IBPS), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे, MES आदी स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे प्रशिक्षण अलीकडे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून, ऑफलाईन प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या मते, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना पुणे, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या शहरांमध्ये राहून अभ्यास करावा लागतो. अशा परिस्थितीत स्पर्धात्मक वातावरण, दर्जेदार मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाची सवय यासाठी ऑफलाईन प्रशिक्षण अत्यंत आवश्यक ठरते. ऑनलाईन पद्धतीत ही सर्व बाबी प्रभावीपणे साध्य होत नसल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना राहण्याचा, भोजन व अभ्यास साहित्याचा खर्च भागवताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ऑफलाईन प्रशिक्षणासोबत दिले जाणारे विद्यावेतन (स्टायपेंड) विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत होते. मात्र ऑनलाईन प्रशिक्षणामुळे या सुविधेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी महाज्योतीमार्फत घेण्यात आलेल्या CET चाळणी परीक्षेला सुमारे ९० टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची बाबही समोर आली आहे. ही विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेविरोधातील नाराजी दर्शवणारी बाब असल्याचे सोलनकर यांनी सांगितले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन ऑनलाईन प्रशिक्षण तात्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करावे तसेच विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर, सरचिटणीस स्वप्नील मोडक, अमर बुदगुडे, ओंकार कड्डे, युवती प्रमुख रसिका सणस, उपाध्यक्ष आबासाहेब थोरात, अनिकेत भालेराव, सुयोग सावंत, परमेश्वर तागुंदे, जगदीश कोळेकर, विवेक साळुंखे, संदीप केसकर आदी उपस्थित होते.