प्रभात वृत्तसेवा पाचगणी – महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपद खुले झाल्याने शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. शहरात मातब्बरांनी उमेदवारीकरीता जोरदार व्यूहरचना केली असल्याचे चित्र आहे .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कृत पॅनेलचे प्रमुख म्हणून माजी नगरसेवक कुमार शिंदे यांचे नाव निश्चित झाले आहे. कुमार शिंदे नगराध्यक्ष पदाकरीता प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मदत व पुनर्ववसन मंत्री मंकरद पाटील यांच्या पुरस्कृत पॅनेलमधुन मातब्बरांची भाऊगर्दी वाढली आहे. माजी नगरसेवक सुनील शिंदे, माजी नगरसेवक नासीर मुलाणी, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. किसनशेठ शिंदे यांच्या भूमिकेवर नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. तर पुतणे सुनील शिंदे आरपारची लढाई करण्याकरीता आमदारांकडे मागणी करत आहेत. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर देखील आपले नशीब आजमवणार आहेत. महाविकास आघाडीकडून राजेंद्र कुंभारदरे व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दोघांकडून नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवार दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. शहरातील थंड वातावरण नगराध्यक्ष पदाकरीता चांगलेच तापले आहे.