Kisanveer Sugar Factory – किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक डबघाईची चर्चा असतानाच, परवाच्या रद्द झालेल्या एका ‘राजकीय’ कार्यक्रमामुळे सभासद शेतकरी आणि कामगारांचे तब्बल ३ कोटी रुपये पाण्यात गेल्याचा खळबळजनक आरोप भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बाबर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशोब द्यायला तयार राहावे,” असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात प्रवीण बाबर यांनी म्हटले आहे की, किसनवीर कारखान्यावर नितीन गडकरींच्या उपस्थितीत एक मोठा पुरस्कार सोहळा आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम शेवटच्या क्षणी रद्द झाला. या एका दिवसाच्या अट्टहासापोटी एसी जर्मन हँगर मंडप ,सजावट, हेलिपॅड , जाहिराती , कार्यक्रमासाठी माणसे आणण्याचा खर्च आणि इतर नियोजनावर झालेला सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च आता वाया गेला आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या उसाचे १२० कोटी रुपये थकीत आहेत. मग कामगारांचे ३८ महिन्यांचे पगार रखडलेले असताना अशा भव्य कार्यक्रमांची गरज होती का? लोकशाही मार्गाने जाब विचारण्यासाठी निघालेल्या मला व कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. ही दडपशाही नेमकी कोणाचे हित साधण्यासाठी? जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर शेवटचा रुपया जमा होत नाही आणि कामगारांना पगार मिळत नाही, तोपर्यंत भूमीपुत्र संघटनेचा हा लढा थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच या उधळपट्टीविरोधात आणि थकीत देण्यांच्या मागणीसाठी मोठ्या आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.