Mahabaleshwar Traffic – महाबळेश्वर-पाचगणी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक. या हिल स्टेशनची ओळख आता वाढत्या वाहतूक कोंडीमुळे धूसर होत चालली आहे. सप्ताहअंत, सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात येथे निर्माण होणाऱ्या भीषण ट्रॅफिक जाममुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यापारी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. पसरणी घाट, पाचगणी बाजारपेठ, टेबल लँड नाका, संजीवन नाका, महाबळेश्वर मुख्य चौक आणि वेण्णालेक परिसरात तासन्तास वाहनांच्या रांगा लागतात. अनेक पर्यटक वाहनांतच अडकून पडतात. काही वेळा तर रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याचे प्रकार घडले आहेत. “पर्यटनस्थळ की वाहनतळ?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रश्नाकडे नव्याने पाहिले जाऊ लागले आहे. पुणे गुन्हे शाखेतील अनुभव, गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागातील कामगिरी आणि आक्रमक प्रशासनशैलीमुळे पिंगळे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुकीची पाहणी सुरू केल्याने प्रशासन हालचालीत आल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा मुक्काम कमी होत आहे. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा. अनेक पर्यटक “एकदाच येतो” अशी प्रतिक्रिया देत आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसाय, टॅक्सी, रेस्टॉरंट, स्थानिक दुकाने आणि छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. पर्यटन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महाबळेश्वर-पाचगणीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. ठोस उपाययोजनांची मागणी वाहतूक समस्येवर काही ठोस उपाययोजनांची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामध्ये एकेरी वाहतूक व्यवस्था, मोठ्या पार्किंग झोनची निर्मिती, ऑनलाइन पार्किंग आरक्षण, अतिरिक्त वाहतूक पोलीस, पर्यटकांसाठी विशेष शटल बस सेवा आणि भारी वाहनांवर वेळेनुसार निर्बंध अशा उपायांचा समावेश आहे. मात्र हे निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “स्मार्ट ट्रॅफिक मॉडेल” बनवण्याची संधी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रणाची मागणीही पुढे येत आहे. ड्रोनद्वारे वाहतूक निरीक्षण, सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही नियंत्रण, डिजिटल ट्रॅफिक अलर्ट प्रणाली आणि नियंत्रण कक्ष उभारल्यास परिस्थिती सुधारू शकते. पर्यटनस्थळाला “स्मार्ट ट्रॅफिक मॉडेल” बनवण्याची संधी प्रशासनासमोर असल्याचे जाणकार सांगत आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि SP निखील पिंगळे यांच्यात प्रभावी समन्वय झाला, तर महाबळेश्वर-पाचगणीसाठी मोठा बदल घडू शकतो. अन्यथा पर्यटनस्थळाच्या नावावर फक्त घोषणाबाजी आणि फोटोसेशन सुरू राहतील, अशी टीका स्थानिकांमधून होत आहे.