Pimpri-Chinchwad : महाविकास आघाडीकडून नवीन सहकारी शासन निर्णयाची होळी
गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सहकार कायद्यात अचानक बदल करण्याच्या निर्णयाचा निषेध

पिंपरी – गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सहकार कायद्यात अचानक बदल करून चार अतिरिक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
सहकारी संस्था या शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या लोकशाही संस्था आहे, या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी मनमानी हस्तक्षेप करणे, कायद्यात अचानक बदल करून मतदानाच्या अधिकारांबाबत निर्णय घेणे, हे सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेला बाधा आणणारे आहे, अशी भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आंदोलनावेळी मांडली.
या आंदोलनात आघाडीतील पक्ष, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस, छावा मराठा युवा महासंघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी महासंघ, डी. वाय. एफ. आय., सी.पी.आय.(एम) लोकशाही युवा संघटना, सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज संघ याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारच्या सहकार क्षेत्रातील हस्तक्षेपाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष वैजनाथ शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव,
संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, प्रवीण कदम, ओबीसी संघर्ष समितीचे प्रताप गुरव, आनंदा कुदळे, सचिन देसाई, डीवायएफआयचे देविदास जाधव, बी बी शिंदे, कविता कोंडे,अश्विनी पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्धीन शेख, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ शेळके, पुरुषोत्तम राऊत, हिराचंद जाधव, कबीर मोहम्मद, विल्यम साळवी, रवींद्र भोसकर, संदीप शिंदे, मेहबूब शेख, रामकिसन माने, लक्ष्मण म्हेत्रे, जितेंद्र छाबडा, आदी उपस्थित होते.





