Raju Shetti : “जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही,” राजू शेट्टींचा अमित शाहांवर हल्लाबोल
Raju Shetti : राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही सवाल

Raju Shetti : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये पंचवार्षिक निवडणुकीनंतर चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
राज्य सरकारने गोकुळ दूध संघात चार संचालक शासननियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला असून या अध्यादेशाला राजर्षी शाहू समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
दुसरीकडे चेअरमन निवडीची महत्त्वपूर्ण बैठक सोडून 12 नवनिर्वाचित संचालक बेपत्ता झाल्याने डाव्या आघाडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या संपूर्ण घडामोडीनंतर या शासकीय हस्तक्षेपाचा तीव्र निषेध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आज सोमवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आक्रमक भाषण करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?
“गोकुळमध्ये तुम्ही पाच स्वीकृत संचालक केला आहे, अजून सहावा एक घ्या, अजून एक अध्यादेश काढा, तो राज्याबाहेरचा घ्या आणि अमित शाहांना स्वीकृत संचालक करा आणि एवढंच नव्हे, त्या अध्यादेशामध्ये अशी तरतूद करा.
स्वीकृत संचालकाला चेअरमन होता येईल आणि रितसर एकदा अमित शाहांना चेअरमन करून टाका, मग समाधान होईल तुमचं? पण एक सांगतो, आम्ही जोपर्यंत जावयाचा आदर करतोय, तोपर्यंत करतो. जावई जर का शहाणपणा करायला लागला आणि सासुरवाडीवरच डोळा ठेवायला लागला, तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही, एवढाच इशारा देतो.
उद्या काही भानगडी करून, कोरम दाखवून त्या पाच संचालकांना आणून जर त्यांनी चेअरमन निवड केला, तर मी तुम्हाला सांगतो, ते आत येतील पण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ,” असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी मोर्चात दिला.
‘गोकुळ एका जिल्ह्याचा संघ, मग तुम्हाला एवढा त्याच्यामध्ये रस का? ‘
पुढे राजू शेट्टी म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस, तुम्ही एका बाजूला म्हणता की, गोकुळ एका जिल्ह्याचा संघ आहे, आम्हाला त्यात रस नाही. मग एका जिल्ह्याचा संघ आहे, मग तुम्हाला एवढा त्याच्यामध्ये रस का? निवडणूक ज्यावेळी झाली तो का जो कायदा होता, जो अधिनियम होता त्या अधिनियमाच्या आधारावर अध्यक्षनिवड व्हायला पाहिजे होती. पण तुम्ही परत अध्यादेश काढला.
तो धरून आणलेला राज्यपाल तुम्ही इथं बसवलेला आहे. असले धंदे कोल्हापूरपुढं चालणार नाहीत. तुम्हाला खरोखरच लोकशाहीसाठी कोरम पूर्ण होत नाही म्हणून जर का स्वीकृत सदस्य नेमायचे होते, तर त्यांना मतदानाचा अधिकार का दिला? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राला द्यावं लागेल,” असे म्हणत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
हेही वाचा :
Papiya Adhikari: “फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होतात” ; भाजप आमदाराचा अजब दावा





