Macau Open 2024 (Badminton) : किदाम्बी श्रीकांतसह आयुष आणि तस्नीमची विजयी सलामी….

Macau Open Badminton 2024 : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत आणि देशबांधव आयुष शेट्टी आणि तस्नीम मीर यांनी बुधवारी येथे मकाऊ ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
मे महिन्यात झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या पहिल्या स्पर्धेत भाग घेत असलेल्या सहाव्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत इस्रायलच्या डॅनिल दुबोव्हेंकोचा 21-14, 21-15 असा पराभव केला. अन्य लढतीत 2023 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या आयुषने देशबांधव भारतीय आलाप मिश्राचा 21-13, 21-5 असा पराभव केला.
माजी जागतिक ज्युनियर नंबर वन तस्नीमने महिला एकेरीत देशबांधव देविका सिहागचा 15-21, 21-18, 22-20 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत, वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 रौप्यपदक विजेता श्रीकांतचा सामना ओडिशा मास्टर्स 2023 चा उपविजेता आयुष याच्याशी होईल. तर पुढील फेरीत तस्नीमचा सामना माजी विश्व ज्युनियर चॅम्पियन आणि चौथ्या मानांकित जपानच्या तोमोका मियाझाकीशी होईल.
दुहेरीत सुमित-सिक्की विजयी…
मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांनी पहिल्या फेरीत ‘लू बिंग कुन’ आणि ‘हो लो ई’ या मलेशियाच्या क्वालिफायर जोडीचा 24-22, 10-21, 21-13 असा पराभव केला.
Macau Open 2024 (Badminton) : मकाऊ ओपनमध्ये त्रिशा-गायत्रीची विजयी सलामी….
इतराकडून निराशा…
अन्य भारतीय स्पर्धकाबदल बोलायचे झाले तर तान्या हेमंत, अनुपमा उपाध्याय, ईशारानी बरुआ, चिराग सेन, एस शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम, समीर वर्मा आणि मिथुन मंजुनाथ यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गड्डे या जोडीला संघर्षमय लढतीत थायलंडच्या आठव्या मानांकित रितनपाक अपथोंग आणि झेनिचा सुदजेप्रात यांच्याकडून 21-23, 22-24 असा पराभव पत्करावा लागला.





