M.K.Stalin : भाजपचा दुटप्पीपणा उघड; तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची टीका

चेन्नई : संसद अधिवेशनातून भाजपचा दुटप्पीपणा उघड झाल्याचे टीकास्त्र तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी शनिवारी सोडले. एकीकडे राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीविषयी त्या पक्षाने जल्लोषाची भूमिका घेतली. तर, दुसरीकडे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, असे स्टॅलिन यांनी म्हटले.
त्यासाठी त्यांनी वादंगास कारणीभूत ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. संसदेत भाजपच्या खासदारांनी लोकशाही विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर मौन बाळगले.
त्यांनी उत्तर देण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली. राज्याच्या अधिकारांशी निगडीत मुद्दे मांडून द्रमुकच्या खासदारांनी चांगली कामगिरी केल्याचे म्हणत स्टॅलिन यांनी स्वपक्षीयांची पाठ थोपटली.





