Indian Premier League Auction 2024, Who is Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या लिलावात भारताचा युवा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीवर पैशांचा वर्षाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. या युवा खेळाडूला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम खर्च करून पाण्यासारखा पैसा खर्च केला. समीर रिझवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती, त्यामुळे धोनीच्या संघाने मोठा डाव खेळला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने समीर रिझवीला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसने कितीतरी पट जास्त पैसे देऊन करारबद्ध केले. तो भारताचा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
कोण आहे समीर रिझवी(Who is Sameer Rizvi)?
मेरठमध्ये जन्मलेला रिझवी 20 वर्षांचा आहे. त्याने UP T20 लीगमध्ये चांगली फलंदाजी केली आणि कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले. त्याने यूपी टी-20 लीगमध्ये दोन शतकांसह 9 डावात 455 धावा केल्या. कानपूर सुपरस्टार संघाकडून खेळताना त्याने गोरखपूर लायन्सविरुद्ध 49 चेंडूत 104 धावांची जलद खेळी खेळली. त्याने या स्पर्धेत 50.56 च्या सरासरीने आणि 188.8 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. रिझवीला तीन आयपीएल फ्रँचायझींनी चाचण्यांसाठी बोलावले होते. यामध्ये पंजाब किंग्ज संघाचाही समावेश होता.
उत्तर प्रदेशचे प्रशिक्षक सुनील जोशी पंजाब किंग्जचा भाग आहेत. रिझवीला यूपी अंडर-23 संघासोबतच्या वचनबद्धतेमुळे चाचण्यांपासून दूर राहावे लागले असले तरी, त्याने 23 वर्षांखालील संघासाठी राजस्थानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूत 91 धावा करून आपल्या क्षमतेची झलक दाखवली. यानंतर रिझवीने अंतिम फेरीत 50 चेंडूत 84 धावा करत संघाला चॅम्पियन बनवले. समीरला यूपी संघात उजव्या हाताचा सुरेश रैना देखील म्हटले जाते. त्याची खेळण्याची शैली रैनासारखीच आहे. रैना यापूर्वी CSK संघाचा भाग होता.
रिझवी अंडर-19 मध्ये इंडिया-बीकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत दोन प्रथम श्रेणी सामने खेळले असून 17 धावा केल्या आहेत. त्याने 27 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश संघासोबत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिल्यांदाच रणजी करंडक खेळला. तर, समीरने 11 डिसेंबर 2021 रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघासोबत लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले.
समीरही उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकतो. समीरने 11 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 29.28 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. सर्व प्रकारच्या लीगसह 11 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने आणि 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत.
8.40 कोटी रुपयांना त्याची विक्री केल्यामुळे, समीर देखील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूंच्या टॉप-10 यादीत सामील झाला. तो यादीत सातव्या क्रमाकांवर पोहचला आहे. या यादीत अव्वेश खान टाॅपवर आहे, ज्याला लखनौ सुपर जायंट्सने 2022 च्या लिलावात 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुसऱ्या क्रमांकावर कृष्णप्पा गौतम (9.25 कोटी) आणि तिसऱ्या क्रमांकावर 9 कोटी रुपयांसह शाहरुख खान आहे.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सात सामन्यांच्या सात डावात 69.25 च्या सरासरीने आणि 139.90 च्या स्ट्राईक रेटने 277 धावा केल्या.