Cardiac arrest: नागपूर विमानतळाच्या बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू

नागपूर – नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेटवर एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. नागपूरहुन पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, विमानात बोर्ड होण्यापूर्वीच ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम असे मृत्यू झालेल्या पायलटचे नाव आहे.
ही घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, कॅप्टन मनोज यांनी काल त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटेच्या (अंदाजे पहाटे 3 ते सकाळी 7 दरम्यान) सुमारास विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी 27 तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज 4 सेक्टरसाठी दुपारी 1 वाजता नागपूरहून प्रस्थान होते. त्यांचे हे विश्रातीनंतरचे पहिले सेक्टर होते.





