LSG vs DC : ‘एक ही तो शॉट आता है…’, कुलदीपने चौकार मारल्यानंतर ऋषभ-अक्षरने घेतली त्याची फिरकी, पाहा VIDEO

LSG vs DC Axar Patel and Rishabh Pant tease Kuldeep Yadav : आयपीएल २०२५ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सने एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा एका विकेट्सने पराभव केला. सामन्यानंतर, डीसीचा कर्णधार अक्षर पटेल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यात एक मजेदार संवाद झाला. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कुलदीपने फलंदाजीतही योगदान दिले. या विजयानंतर तिन्ही खेळाडूंमधील मैत्री पाहण्यासारखी होती. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कुलदीप यादवने मारलेल्या चौकाराची चर्चा –
दिल्ली कॅपिटल्स संघ २१० धावांचा पाठलाग करत होता. कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने पाच चेंडूत पाच धावा काढल्या. त्याने आशुतोष शर्मासोबत नवव्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली, जी खूप महत्त्वाची ठरली. कुलदीपने प्रिन्स यादवविरुद्ध चौकार मारला, ज्याची खूप चर्चा झाली.
अक्षर आणि पंतने कुलदीपची उडवली खिल्ली –
सामन्यानंतर ऋषभ पंतने कुलदीपला चिडवले. तो म्हणाला, ‘मी एक धाव घेत होतो, पण चौकार मारला.’ स्वतःचा बचाव करताना कुलदीप म्हणाला, ‘माझे काम एक धाव घेणे होते. गोलंदाजाने स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. हे ऐकून पंत आणि अक्षर पटेल दोघेही हसले. ते एकत्र म्हणाले, ‘फक्त एकच शॉट तर येतो.’ या तिघांच्या या मजेशीर संवादाचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.
Who called 2024? 🥹🙌 pic.twitter.com/VIdLIGqnbX
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 25, 2025
या सामन्यात आशुतोष शर्माने शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद ६६ धावा करत दिल्ली कॅपिटल्सला एका विकेट्सने विजय मिळवून दिला. दिल्लीने २१० धावांचे लक्ष्य तीन चेंडू शिल्लक असताना गाठले. एका क्षणी संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी ७ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर नवीन कर्णधार अक्षर पटेलने २२ धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्सने ३४ धावांचे योगदान दिले.
कुलदीप यादव धावचीत झाला, तेव्हा दिल्लीला विजयासाठी ९ चेंडूत १८ धावांची आवश्यकता होती. प्रिन्स यादवविरुद्ध आशुतोष शर्माने तीन चेंडूत १२ धावा केल्या. शेवटच्या षटकात दिल्लीला जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता होती. ऋषभ पंतने शाहबाज अहमदच्या हाती चेंडू सोपवला. मोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर यष्टीचित होऊ शकला असता, पण पंतने ती संधी गमावली. दुसऱ्या चेंडूवर मोहितने एक धाव घेतली आणि तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने षटकार मारून सामना संपवला.





