LPG Shortage : एलपीजी गॅस संपणार की महागणार? ग्रामीण भागात अफवांचं पीक; एजन्सींवर नागरिकांची गर्दी
LPG Shortage : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील अस्थिरतेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सावट; गॅस एजन्सीबाहेर तासनतास प्रतीक्षा करण्याची वेळ.

LPG Shortage – आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या भीतीमुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने या परिस्थितीचा परिणाम होईल, अशी भीती काही नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गॅस सिलिंडर उशिरा मिळत असल्याच्या अफवा पसरत आहेत. कामशेत शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुरवठा कमी होईल या भीतीने अनेक नागरिक आगाऊ सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांनी घाबरून गॅस खरेदी करू नये असे आवाहन केले आहे. घरगुती एलपीजीचा पुरवठा नियमित सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तसेच तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरीही ग्रामीण भागात अफवा आणि भीतीमुळे गॅस एजन्सींवर नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे.





