LPG Shortage : पुण्यात गॅस संकट! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प; हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर टाळं लागणार?
LPG Shortage : युद्धाच्या भीतीने कंपन्यांकडून पुरवठ्याचा वेग मंदावला; चाकण आणि शिक्रापूर गॅस प्लांटमधील हालचालींनी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

LPG Shortage – आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि बदलत्या शासकीय नियमांमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण आला असून, त्याचे चटके आता सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना बसू लागले आहेत. पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे, तर घरगुती गॅस मिळण्यासाठीही आता ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि शिक्रापूर येथील गॅस प्लांटमधून व्यावसायिक सिलिंडरचे वितरण थांबविले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
अचानक पुरवठा थांबल्यास हॉटेल व्यावसायिक हवालदिल होणार आहेत. पुढील काही दिवस हीच स्थिती राहिली, तर अनेक हॉटेल्सना आपले कामकाज मर्यादित करावे लागेल किंवा बंद ठेवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गॅस डीलर्सना प्लांट प्रशासनाकडून सध्या व्यावसायिक वापरासाठी नवीन बुकिंग घेऊ नये, अशा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
उपलब्ध मर्यादित साठाच प्राधान्याने वितरित केला जात असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शासनाने घरगुती सिलिंडरच्या दुसऱ्या बुकिंगसाठी २५ दिवसांची अट लागू केल्याने मोठ्या कुटुंबांचे नियोजन कोलमडले आहे.
पूर्वी १५ दिवसांनी मिळणारे बुकिंग आता २५ दिवसांनी होत असल्याने सिलिंडर संपल्यानंतर १० दिवस काय करायचे, असा प्रश्न गृहिणींसमोर आहे. युद्धाच्या धास्तीने भविष्यात तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कंपन्यांनी पुरवठ्याचा वेग मंदावला आहे. परिणामी डिलिव्हरीसाठी ३ ते ५ दिवस जास्त लागत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.
हॉटेल व्यवसाय संकटात
सद्यस्थितीत हॉटेलचालक इतर गॅस एजन्सींकडून सिलिंडर मिळवत आहेत. ज्या एजन्सींकडे गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत, ते हॉटेलचालकांना ते देत आहेत. मात्र, हा पुरवठाही येत्या तीन- चार दिवसांत थांबण्याची शक्यता आहे. चहा, नाश्ता आणि वडापाव विक्रेत्यांकडे सहसा बॅकअप साठा नसतो. सिलिंडर न मिळाल्यास त्यांचा रोजचा व्यवसाय बंद पडण्याची भीती आहे.
शहरातील मोठे रेस्टॉरंट्स असोत किंवा कोपऱ्यावरील चहा-वडापावची टपरी, प्रत्येकासमोर आता उद्या चूल पेटणार कशी, असा प्रश्न आहे. सध्या इतर एजन्सींकडून कशीबशी जुळवाजुळव सुरू असली, तरी हा साठाही येत्या तीन-चार दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत.






