Dukes Ball Shortage : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र संकट! चेंडूंच्या टंचाईमुळे काउंटी सामने रद्द? पाहा काय आहे नेमकं कारण
Dukes Ball Shortage : इंग्लंडमधील आगामी काउंटी क्रिकेट हंगामावर चक्क 'चेंडू' संपल्यामुळे मोठे संकट ओढवले असून, खेळाडूंसमोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

Dukes Cricket Ball Shortage England : रणांगणावरील तोफांच्या धडाक्याने आता क्रिकेटच्या मैदानावरील शांतता भंग केली आहे. पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘ड्युक्स’ (Dukes) चेंडूंच्या पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. ३ एप्रिलपासून इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप सुरू होत आहे, मात्र त्यापूर्वीच अनेक क्लबकडे पुरेसे चेंडू उपलब्ध नसल्याने खळबळ उडाली आहे.
बॉम्बफेकीमुळे चेंडूंच्या सिलाईला ब्रेक?
ड्युक्स चेंडू तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. या चेंडूंचे चामडे (Leather) इंग्लंडमध्ये तयार होते, पण त्याची हाताने सिलाई भारतीय उपखंडात केली जाते. त्यानंतर हे चेंडू हवाई मार्गाने मध्य-पूर्वेतील देशांच्या एअरस्पेसचा वापर करून पुन्हा इंग्लंडला पाठवले जातात. मात्र, युद्धामुळे या क्षेत्रातील विमान उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. मालवाहतुकीचा खर्च तीन पटीने वाढला असून, अनेक एअरलाईन्स या भागातून उड्डाण करण्यास नकार देत आहेत.
केवळ ५० टक्के चेंडू उपलब्ध –
इंग्लंडमध्ये ड्यूक्स क्रिकेट बॉलचा तुटवडा (Dukes Ball Shortage)
ड्युक्स कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी या परिस्थितीला “मोठे संकट” म्हटले आहे. त्यांच्या मते, कारखान्यांमध्ये स्टॉक तयार असूनही विमान वाहतूक बंद असल्याने चेंडू पोहोचवता येत नाहीत. परिणामी, काउंटी क्लबला सुरुवातीला गरजेच्या केवळ ५० टक्के चेंडूंचा पुरवठा केला जाणार आहे. चार दिवसांच्या क्रिकेटमध्ये चेंडू वारंवार बदलावा लागतो, अशा वेळी चेंडूंची कमतरता खेळाची गुणवत्ता आणि रणनीती दोन्हीवर परिणाम करू शकते.
इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर मोठा पेच –
काउंटी क्लबने यापूर्वीच ‘कुकाबुरा’ चेंडू वापरण्यास नकार दिला आहे. आता पर्यायी मार्ग म्हणून श्रीलंकेमार्गे शिपमेंट पाठवण्याचा विचार सुरू आहे, परंतु त्यातही अनेक तांत्रिक अडचणी आहेत. युद्धामुळे केवळ लॉजिस्टिकच नाही, तर संपूर्ण इंग्लंड क्रिकेट हंगामाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





