LPG Gas Shortage: शहरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे व्यवसाय नियमित गॅस पुरवठ्यावर अवलंबून असल्याने व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले, तरी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने घरगुती ग्राहकांना करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती सिलिंडरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसताना व्यावसायिक सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. पुण्यातील हॉटेल व खानावळ व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल आणि इतर खर्च कायम असताना गॅसपुरवठा कमी झाल्याने व्यवसाय चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही जण इलेक्ट्रिक इंडक्शन, चुली किंवा इतर पर्यायांचा विचार करत आहेत. मात्र, हे पर्याय महाग असल्याने उत्पादन आणि नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खानावळीत प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी जेवतात. खानावळी बंद झाल्यास या विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते. काही खानावळी कमी पदार्थ देणे किंवा चुली-कोळशाचा वापर करून सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यामुळे शहरातील वायूप्रदूषण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘दररोज सुमारे १५० ते २०० विद्यार्थी जेवायला येतात आणि त्यासाठी दोन सिलिंडर लागतात. मात्र, काही दिवसांपासून पुरवठा खंडित झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी सिलिंडर, पदार्थ कमी करणे किंवा भट्टीचा वापर असे पर्याय वापरावे लागतील.’ – नीलेश चौधरी, खानदेश जंक्शन ‘हॉटेल व्यवसायासाठी गॅस अत्यावश्यक आहे. काही दिवस एजन्सीकडून पुरवठा झाला. मात्र, पुढे तो सुरू राहील, याची खात्री नाही. इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय विचारात असला, तरी वीज दर जास्त असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.’ – कुलदीप कदम, हॉटेल ऐरावत