पुणे | मेट्रोच्या कामात खासगी मिळकतींचे नुकसान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशखिंड रस्त्यावर संचेती हाॅस्पिटल ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकापर्यंत पीएमआरडीएकडून मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. यात विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथे गर्डर लाॅचिंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अति अवजड क्रेन मुळे पाच खासगी मिळकतींचे तसेच महापालिकेचे नुकसान झाले आहे.
ही बाब गंभीर असल्याने महापालिकेने पीएमआरडीएला १३ लाख ७० हजार ८९७ रूपयांचा दंड आकारला आहे. झालेल्या नुकसानीच्या तीन पट हा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, हे काम करणाऱ्या टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, अशी विचारणा त्याद्वारे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता ४५ मीटर असून सध्या तो ३६ मीटर रुंद आहे. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या रुंदीकरण केले जात आहे.
मात्र, या क्रेनमुळे पाच खासगी मिळकतींचे नुकसान झाल्याने नागारिकांमध्ये रोष आहे. तसेच, महापालिकेने या भागात नव्याने करण्यात आलेले पदपथही या क्रेनमुळे उखडले आहेत. याची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. या प्रकरणी पीएमआरडीएला जीएसटीसह दंड आकारला आहे.





