Pune : बोन बॅंकेमुळे हाडांच्या विकारातील रुग्णांना संजीवनी

पुणे : संचेती रुग्णालयात सुरू केलेल्या बोन बॅंकेमुळे आघात आणि हाडांच्या विकारातील रुग्णांना संजीवनी मिळत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक रुग्णांना या बोन बॅंकेचा फायदा झाला आहे, अशी माहिती संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. चेतन प्रधान, बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ. प्रमोद भिलारे, आर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिनव भुते व डॉ. साहिल संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पाईन सर्जन डॉ. प्रमोद भिलारे म्हणाले, दात्यांकडून शस्त्रक्रियांदरम्यान वाया जाणाऱ्या हाडांचे भाग प्राप्त करून ते साठवले जातात. खुब्याचा संधिवात, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, नेक ऑफ फेमर फ्रॅक्चर (मांडीमध्ये असलेल्या लांब हाडाचे फ्रॅक्चर) अशा स्थितींसाठी खुबा किंवा गुडघ्याच्या सांध्यांची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाते ते सामान्यत: दाते बनू शकतात. या दात्याच्या शरीरातून काढलेले हाडांच्या भागांवर गोठविण्यापूर्वी अनेक चाचण्या केल्या जातात.
डॉ. साहिल संघवी म्हणाले, ही काढलेली हाडे किंवा त्याचे भाग अनेक पुर्नरचनात्मक प्रक्रियांसाठी उपयुक्त ठरतात. आघातामुळे झालेले हाडांचे विकार किंवा हाडांमधून ट्युमर काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर होतो. यामुळे दात्यांमध्ये पण गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते आणि चांगले परिणाम दिसून येतात. ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. चेतन प्रधान म्हणाले, अपघात आणि इतर स्थितीमुळे हाडांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हा उपक्रम वरदान ठरेल. ही बोन बँक जागतिक दर्जाची असून आतापर्यंत शंभरहून अधिक रुग्णांना याचा लाभ झाला.
शस्त्रक्रियांमध्ये एरवी वाया जाणाऱ्या संसाधनांचा वापर शक्य झाला आहे. काही बाबतीत धातूंच्या रोपणाचा वापर कमी करण्यासदेखील मदत होऊ शकते. पुण्यातील आर्थोपेडिक्स क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा असून, रुग्णांना चांगले जीवनमान देणारा उपक्रम ठरेल.
डाॅ. पराग संचेती – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संचेती हाॅस्पिटल





