पुणे | अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी परीक्षेची संधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ठराविक मुदतीत पूर्ण करता आले नाही अथवा त्यांचे एक अथवा दोन असे बॅकलाॅग विषय राहिले आहेत, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी परीक्षेची संधी देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे,
अशा विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दहा हजारच्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी लिंक खुली करण्यात आली असून त्याची अंतिम मुदत दि. ५ आॅक्टोबरपर्यंत आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना ठराविक वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
त्या कालावधीत शिक्षण पूर्ण केले नाही तर पुन्हा पहिल्या वर्षांपासून शिक्षण घ्यावे लागते. एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण असल्याने पूर्ण पदवी घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यात आली.
त्यांनी दोन परीक्षेत राहिलेल्या विषयांत उत्तीर्ण झाल्यास त्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे. २०१३ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे, त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
दिलेल्या मुदतीत अर्ज न करणे, विद्यार्थ्यांपर्यंत माहिती न पोहोचणे आदी कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची सर्व जबाबदारी संबंधित महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांची राहील.
या संधीचा लाभ घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. – डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुणे विद्यापीठ





