पुणे | वनविभागाच पुणे विद्यापीठाशी सामंजस्य करार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वनविभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी वनविभागाकडून अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण) एम. श्रीनिवास रेड्डी आणि विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते.
हा सामंजस्य करार एम. एस्सी.पुरस्कृत करण्यासाठी विद्यापीठाबरोबर सहयोग म्हणून करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी आणि कुंडल फॉरेस्ट अकादमी येथे १८ महिन्यांचा इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम घेत असलेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सना पदवी /पीजी डिप्लोमा मिळणार आहे.
या सामंजस्य कराराची सुरुवातीची मुदत स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत वाढेल, जी रेंज फॉरेस्ट ऑफिसर्ससाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
हे सहकार्य चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट आणि कुंडल फॉरेस्ट अकादमी या दोन प्रमुख वन अकादमींमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सच्या शैक्षणिक आणि व्यावहारिक प्रशिक्षणावर केंद्रित आहे.
सामंजस्य कराराअंतर्गत, या अकादमी एम.एस्सी. आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम एनईपी २०२० मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने आधुनिक वन व्यवस्थापन आणि संवर्धन प्रयत्नांच्या गरजेनुसार तयार केले आहेत.
या उपक्रमाचा उद्देश वनसंरक्षणातील कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करणे आणि अधिकाऱ्यांना पर्यावरण शास्त्रातील प्रगत ज्ञानाने सुसज्ज करणे हा आहे. शाश्वत वन व्यवस्थापन आणि पर्यावरणीय कारभाराला चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्था यांच्यातील दीर्घकालीन संबंध अधिक मजबूत करणार आहे.
या वेळी प्रा. डॉ. पराग काळकर, प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्रा. डॉ. संजय ढोले, प्रा. डॉ. रेमंड ए. दुराईस्वामी, एन.आर. प्रवीण, आशिष ठाकरे, महादेव मोहिते, पंकज गर्ग, अमोल थोरात आदी प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते.



