Pune | रुग्णाची प्रकृती बिघडल्यास तत्काळ “अलर्ट’

पुणे,- वाॅर्डमध्ये दाखल रुग्णाची प्रकृती बिघडल्यास तत्काळ “अलर्ट’ देणाऱ्या सिस्टीममुळे रुग्णाला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होते.रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेऊन संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने आर्टिफिशिएल इंटिलिजन्सवर (एआय) आधारित रिमोट मॉनिटरिंग सिस्टिम (आरएमएस) आणि अर्ली वॉर्निंग सिस्टिम (ईडब्ल्यूएस) च्या साहाय्याने पहिला स्मार्ट वॉर्ड उपक्रम सुरू केला आहे.
याबाबतची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेयी त्यांनी अत्याधुनिक सुविधा असलेल्या संचेती ॲडव्हान्स्ड आर्थो केअर हॉस्पिटलची घोषणा केली आहे. 300 खाटांची अद्ययावत वैद्यकीय सुविधा पूर्णपणे कार्यान्वित असून स्मार्ट, ग्रीन, हायटेक (एसजीएच) पायाभूत सुविधांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. “डोझी’ कंपनीची अद्ययावत मॉनिटरिंग सिस्टिम प्रस्थापित करणे हे हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेमध्ये एक परिवर्तनीय पाऊल असल्याचे सांगत डाॅ. पराग संचेती म्हणाले, स्मार्ट वॉर्ड उपक्रमाअंतर्गत बिगर-आयसीयू बेडस अत्याधुनिक रिमोट पेशंट्स मॉनिटरींग सिस्टिम्सयुक्त होतील. ज्यामुळे महत्त्वाच्या वैद्यकीय निकषांवर देखरेख ठेऊन गरज पडल्यास योग्य वैद्यकीय सेवा देता येतील.
हृदयाचे ठोके, रक्तदाब, एसपीओ-2 पातळी, तापमान आणि ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींवर देखरेख ठेवता येईल. रुग्णाच्या आरोग्यात बिघाड झाल्यास या वॉर्निंग सिस्टिममुळे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सूचना मिळून योग्य वेळेत गरजेनुसार हालचाली करता येतात. संचेती समूहाचा रुग्णकेंद्रित दृष्टीकोन आणि स्मार्ट आणि शाश्वत आरोग्य सेवेसाठी कटिबद्धता ही अद्ययावत रुग्णसुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याच्या “डोझी’च्या ध्येयाशी सुसंगत आहे. असे मत “डोझी’चे भारतातील प्रमुख कौशल पांड्या यांनी सांगितले.





