पुणे जिल्हा | वळीवाने पाँली हाऊसचे कोटींचे नुकसान

सोरतापवाडी, (वार्ताहर)- सोरतापवाडी, तरडे, कोरेगाव मूळ, नायगाव, पेठ, भवरापूर, टिळेकरवाडी आदी गावांत वळीवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरीच नव्हे तर व्यावसायिक सर्वसामान्य नागरिक यांचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सोरतापवाडी येथे जोरदार पावसाने व वाऱ्याने पॉलीहाऊसचे नुकसान होऊन आठ दिवसात मार्केट मध्ये येणारी रोपे जळून गेलेली आहेत.
सोरतापवाडी परिसरातील नर्सरीमध्ये विविध विदेशी प्रकारांची फुले, रोपे तयार केली जातात. ज्याला मार्केटमध्ये खूप मागणी असते. परंतु हातातोंडाशी आलेला शेतीमाल निसर्गाच्या कोपामुळे खराब झाला आहे. नर्सरी उद्योगाचे फार नुकसान झाले असून परिसरातील पॉलिहाऊसचे कागद पूर्णपणे भुईसपाट झाले आहेत.
पॉलिहाऊस उभारण्यासाठी दहा गुंठ्याला दहा ते बारा लाख रुपये खर्च येत आहेत. परिसरात अनेक पॉलिहाऊसचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोरतापवाडी येथील शेतकरी रामभाऊ बबन कड यांचा २० फूट रुंद व ३०० फूट लांब असलेला गाईंचा गोठा पूर्णपणे सपाट झाला.
यावेळी गोठ्यात ६० गाईच्या अंगावर हा सांगडा कोसळून काही गाई जखमी झाल्या आहेत. कड यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तरडे गावात अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळले तर नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ टिळेकरवाडी आदी गावात शेतीची फार नुकसान झाले आहे. भाजीपाला पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाने फळबागेला सुध्दा पावसाचा तडाखा बसला आहे.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी गावभेट दौरा केला. हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन तलाठी यांना काही सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व सुदर्शन चौधरी यांनी देखील गावभेट दौरा करून बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली.
नर्सरी व्यवसाय हा शेती पूरक व्यवसाय असल्याने शासनाने शेतीमालाची नुकसान हा निकष लावून पंचनामा करावा. नुकसान भरपाई द्यावी. शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी नर्सरी व्यवसायात गुंतवणूक केली. परंतु अवकाळी पावसाने त्यांच्या नशिबी निराशाच आणली. तरी याची दखल घेत शासनाने पाऊले उचलावीत. – स्वप्नील कुंजीर, शिवसेना ठाकरे गट नेते)
लवकर मदत करावी- अशोक पवार
आमदार अशोक पवार म्हणाले की, सलग दोन दिवस आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे व नर्सरी उदयोगाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्वरित पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
प्रदीप कंद म्हणाले की, सोरतापवाडी परिसरातील गावात वादळी पावसाने पाँली हाउसधारकांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाच्या जीआरमध्ये नुकसान भरपाईची तरतूद नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याशी चर्चा केली आहे.
सोमवारी (दि. २७) जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन तशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. पाँली हाउसधारकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.





