‘जगातील स्थिती पाहता देशाला मजबूत नेत्याची गरज’ – परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

शिमला – सध्या जगात तणावाची स्थिती आहे. काही काळापासून सुरू असणाऱ्या संघर्षांना तातडीने पूर्णविराम मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जगातील स्थिती पाहता भारताला मजबूत नेत्याची आणि स्थिर सरकारची गरज आहे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवारी मांडली.
शिमल्यात निवडक पत्रकारांशी बोलताना जयशंकर यांनी सध्या सुरू असणाऱ्या रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-गाझा-इराण संघर्षांकडे लक्ष वेधले. भारतीय सीमांवरही काही मुद्दे आहेत. अशा स्थितीत भारताकडे मजबूत नेतृत्व असल्याचा संदेश जायला हवा. रशियाशी संघर्ष होत असताना तुमचे कुटूंब युक्रेनमध्ये असते;
तर आपल्या देशाच्या नेतृत्वस्थानी कोण असावे असे तुम्हाला वाटले असते? पंतप्रधान नरेंद्र मोदी की इतर चेहरा? पुढील चार-पाच वर्षांचा काळ अवघड असल्याचे मला वाटते. आपल्या सीमांवरही संघर्ष होऊ शकतो. ती बाब विचारात घेऊन मतदारांनी सुज्ञपणे मतदान करायला हवे.
मोदी सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ म्हणजे सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्या पाठिंब्याचा पाया विस्तारत आहे. मोदींकडे मजबूत नेता म्हणून पाहिले जात आहे, असे जयशंकर यांनी म्हटले.





