Satara | फुगेवाल्या भिकाऱ्यांमुळे लोणावळेकर हैराण

लोणावळा, {विशाल पाडाळे} – शारिरिक दृष्ट्या सक्षम असून देखील लोणावळा शहरातील कुमार चौक आणि स्केअर मॉल येथील रस्त्यावर फुगे विकून आणि भीक मागून येथे येणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरविणाऱ्या भिकाऱ्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.
यामुळे केवळ पर्यटकच नाही तर स्थानिक नागरिक देखील प्रचंड हैराण झाले असून या लोकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी लोणावळेकर नागरिक करीत आहे.
पोट भरायला आले पण भिकारी बनले –
लोणावळा शहरात मागील काही वर्षांपूर्वी पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी एक गट दाखल झाला होता. सुरुवातीला एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली झोपड्या ठोकून राहणाऱ्या या टोळक्यातील पुरुष मंडळी मजुरीसाठी जात आणि बायका-मुलं आहे तिथेच थांबत.
मात्र त्यानंतर यातील काही बायका आपल्या अगदी लहान मुलांना पाठीला बांधून शहरातील सर्वात वर्दळीच्या कुमार चौक आणि स्केअर मॉल रस्त्यावर तसेच हॉटेल रामकृष्णा समोर पर्यटकांकडे भीक मागू लागले.
भीक मागण्याच्या धंद्यात चांगला पैसा असल्याचे लक्षात आल्यावर सर्वच महिला आणि त्यांची मुले याठिकाणी येऊ लागली. नंतर त्यांनी आपला बोऱ्या बिस्तरा उचलून स्केअर मॉल या ठिकाणच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या मोठ्या बॅनरखाली आणला आणि तिथेच तळ ठोकून राहू लागले.
त्याच ठिकाणी झोपणे, त्याच ठिकाणी कचरा आणि घाण करणे, त्याठिकाणी असलेल्या पाण्याच्या कारंज्याच्या पाण्यात भांडी घासणे, अंघोळी करणे, याशिवाय नको त्या गोष्टी करणे याचे प्रमाण वाढल्याने तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी नगरपरिषद आणि पोलीस दलाच्या मदतीने ३ ते ४ वेळा या सर्वांना शहरातून अक्षरशः ट्रक भरून हाकलून दिले. मात्र प्रत्येक वेळी ही लोक परत परत येऊन आपले बस्तान मांडत आहेत.
लहान मुलांकडून जाणूनबुजून फुगे विक्री –
मागील दोन वर्षांपासून या लोकांनी आपली पद्धत बदलली असून ३ ते ४ वर्षांच्या लहान लहान मुलामुलींच्या हातात फुगे देऊन ते विकण्याच्या नावाखाली पर्यटक, सिग्नलवर, चौकात थांबलेली वाहने यांच्या मागे लावले जाते. यात आता मोठमोठी मुले आणि मुली तसेच महिला देखील सहभागी होऊ लागले आहेत.
फुगे विकताना लहान मुलांना लक्ष केले जातेच. परंतु त्याबरोबर आता मोठमोठ्या लोकांच्या मागे सुद्धा ही ‘गॅंग’ फुगे घेऊन पळतात. एकीकडे एका हातात फुगे घ्यावे म्हणून गळ घालणे आणि त्याचवेळी दुसऱ्या हाताने फुगे नाही घेत तर काहीतरी भीक द्यावी म्हणून या लोकांचे हात ओढणे, पाय पकडणे, कपडे, हातातील बॅग ओढणे, ती लोक गाडीत बसेपर्यंत त्यांचा पिच्छा काढणे, नंतर गाडीच्या काचा वाजवणे, हँडल ओढणे, अक्षरशः गाडीला लटकण्यासारखे प्रकार देखील ही मंडळी करतात.
अपघाताची शक्यता वाढलीये –
सिग्नल चौकात चालत्या गाड्यांना आडवे जाणे, गाडीपुढे उभे राहणे तसेच त्यांच्यात आपापसात जेव्हा भांडणे होतात तेव्हा रस्तावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या न बघता स्वैरपणे पळणे यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी अपघाताची शक्यता वाढली आहे.
मात्र असा अपघात झाल्यास यातील कोणीतरी जीवाला मुकेल पण काहीही दोष नसताना याचा दोषारोप हा गाडी चालवणाऱ्यावर येईल, त्यामुळे स्थानिक नागरिक देखील वैतागून गेले आहेत.
लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण देश पातळीवर सातत्याने सलग ६ वेळा पहिल्या पाचात क्रमांक मिळविला आहे. हे यश राखण्यासाठी नगरपरिषदेला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मात्र शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मुख्य चौकात आणि रस्त्यालाच या टोळक्यांकडून पसरविण्यात येत असलेल्या अस्वच्छतेमुळे, तसेच भीक मागत फुगे विकणाऱ्या लहान मुलामुलींचे दिसणे चित्र अत्यंत दाहक असे दिसते. प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून या मुलांची आणि शहराची सुटका करावी, अशी अपेक्षा लोणावळेकर नागरिक बाळगत आहे.





