Lonavala News: लोणावळ्यात दुयम निबंधक कार्यालयाबाहेर स्लॅब कोसळला! मुंबईतील नागरिक गंभीर, नगरपालिकेच्या कारभारावर संताप
Lonavala News: प्लास्टर उखडले, लोखंडी रॉड आले बाहेर; नियमित भाडे आणि कर वसूल करणाऱ्या लोणावळा नगरपालिकेची स्वतःचीच इमारत बनली धोकादायक!

Lonavala News- सामान्य नागरिकांच्या इमारतींमध्ये काही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने नोटिसा बजावणाऱ्या लोणावळा नगरपालिकेची स्वतःचीच इमारत आज गंभीर धोक्यात आली आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या व नियंत्रण असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाची’ अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या इमारतीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.
या व्यापारी संकुलामध्ये अनेक गाळेधारकांसह विविध कार्यालये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘दुयम निबंधक कार्यालय’ (सब-रेजिस्ट्रार ऑफिस) कार्यरत आहे. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे देशभरातून तसेच मुंबई-पुण्यातील अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि नागरिक जमिनी व संपत्तीच्या व्यवहारासाठी सतत येत असतात. मात्र, याच वर्दळीच्या ठिकाणी नगरपालिकेचे प्रशासन मात्र पूर्णपणे डोळेझाक करताना दिसत आहे.
सोमवारी या व्यापारी संकुलातील उपनिबंधक कार्यालयाबाहेर मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या मुंबईतील आयसीयू (आय सी यू) मध्ये उपचार सुरू आहेत. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे इमारतीच्या सुरक्षेचा व प्रशासनाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून या अपघाताची नेमकी जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
स्थानिक व भाडेकरूंच्या तीव्र प्रतिक्रिया
व्यापारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे म्हणणे, या संकुलात अनेक वेळा प्लास्टर सुटून खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील गाड्यांच्या पार्किंगवर आणि नागरिकांच्या अंगावर प्लास्टरचे तुकडे पडतात. अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
कार्यालयांची अंतर्गत दुरवस्था
येथील एका कार्यालयातील छताचे प्लास्टर पूर्णपणे उखडले असून, आतील सत्व लोखंडी रॉड (रॉड व शीगा) बाहेर आले आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी स्वतः विविध कामांसाठी येथे येतात, परंतु इतकी जीवघेणी परिस्थिती असतानाही स्वतःच्याच इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत प्रशासन गंभीर नाही.
करवसुली भारी, पण सुविधा शून्य
नगरपालिका नागरिकांकडून व भाडेकरूंकडून विविध कर आणि भाडे नियमित वसूल करते, परंतु सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. या व्यापारी संकुलात नेहमीच वकील, नागरिक, नगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची वर्दळ असते. असे असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष हे लोणावळ्यासाठी अत्यंत शोकांतिकेचे ठरत आहे. आता तरी लोणावळा नगरपरिषद या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार का? की एखाद्या मोठ्या जीवितहानीची वाट पाहिली जात आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.






