Bhigwan News: धोकादायक स्लॅबखालीच विद्यार्थ्यांचे शिक्षण! भैरवनाथ विद्यालयात कोसळलेला स्लॅब दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
Bhigwan News: भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयाच्या वर्गखोलीतील स्लॅब कोसळून महिना उलटला; डागडुजी न झाल्याने धोकादायक खोलीतच वर्गांचे अध्यापन सुरू.

Bhigwan News- येथील भैरवनाथ विद्यालयामधील शाळेच्या वर्गखोलीतील स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिना होत आला असून, या घटनेनंतर शाळा प्रशासन व संस्थेच्या वतीने केवळ पाहणी करण्यात आली. अद्याप स्लॅबची आवश्यक डागडुजी करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या धोकादायक वर्गखोलीत विद्यार्थ्यांचे नियमितपणे शिक्षण सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वर्गखोलीच्या छताचा मोठा भाग खराब झालेला असून स्लॅबला तडे गेल्याचे तसेच प्लास्टरचा भाग उखडल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी स्लॅबचा भाग अचानक खाली पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सुदैवाने त्यावेळी मोठी दुर्घटना टळली. मात्र, उर्वरित कमकुवत भाग भविष्यात अचानक कोसळल्यास विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या वर्गखोलीत विद्यार्थी बसून शिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यावर धोकादायक अवस्थेतील छत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. दुर्घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी, संभाव्य धोका ओळखून तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे.
पाहणीपुरतीच कार्यवाही नको
शाळा प्रशासन व संस्थेने विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित वर्गखोली तात्पुरती बंद करून विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करावी आणि स्लॅबची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. तसेच संबंधित बांधकामाची तांत्रिक तपासणी करून शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही, याबाबत स्पष्टता देण्याची मागणीही केली जात आहे. पाहणीपुरतीच कार्यवाही नको; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने डागडुजी करा, अशी अपेक्षा पालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“संस्थेचे पदाधिकारी इमारतीची पाहणी करून गेले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप आला नाही. इतरही डागडुजी करणे बाकी आहे. लवकरच यावर कार्यवाही केली जाईल.”
– डी. डी. खराटे, मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय, भिगवण.





