Waksai scrap theft: वाकसईतील लोखंडी स्क्रॅप चोरी उघड! लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई, ५ जण जेरबंद
Waksai scrap theft: वाकसई येथील पाटण जैन मंडळाच्या धर्मादाय ट्रस्टच्या जागेवरून १५ टन लोखंडी साहित्य आणि पाइपची झाली होती चोरी; पोलिसांकडून मुद्देमालासह वाहने जप्त.

Waksai scrap theft- वाकसई येथे बांधकामासाठी ठेवलेले १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा लोखंडी स्क्रॅप आणि पाइप चोरीला गेल्याचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. १० सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान मौजे वाकसई येथील पाटण जैन मंडळाच्या धर्मादाय ट्रस्टच्या बांधकामासाठी मोकळ्या जागेत ठेवलेला लोखंडी स्क्रॅप आणि पाइप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी लाखन सिंह (रा. उपरसया, ता. गंगाखेड, जि. परभणी), मुबारक खान (रा. साकीनाका, मुंबई), मोहम्मद सफिक मोहम्मद जमालउद्दीन करम हुसेन मिनार (रा. कल्याण, ठाणे), निसार खान (रा. पनवेल, मुंबई) आणि मोहम्मद सफिक मोहम्मद हाफिफ खान (रा. भिवंडी, ठाणे) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरी केलेला १५.७१५ टन लोखंडी बांधकाम साहित्य,
स्क्रॅप व पाइप असा १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, पिकअप आणि कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मोहन सिंह हा या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया म्हैसेत्रे करीत आहेत.





