Lonand Bypass Robbery: लोणंद बायपासवर थरार! कारची काच फोडून महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून चोरटे पसार
Lonand Bypass Robbery: दगडाने कारची काच फोडून लॉक उघडले, लोणंद बायपासवरील धाडसी चोरीमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस तपास सुरू.
Updated On:

Lonand Bypass Robbery – कारची काच फोडून कारमधील महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना लोणंद बायपास परिसरात घडली. रविवार, दि. 22 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने वाहनधारकांसह स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक माहिती अशी, भाग्यश्री वैभव खोपडे (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) या रविवारी सायंकाळी आपल्या पती वैभव खोपडे यांच्यासोबत माळशिरस तालुक्यातील कोंडबावी येथून पुण्याकडे मारुती सुझुकी बलेनो (एमएच-12-टीडी-4491) कारने निघाल्या होत्या.
रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास लोणंद बायपासवर आल्यानंतर वैभव खोपडे यांनी शौचविधीसाठी कार रस्त्याकडेला उभी केली. ते वाहनापासून काही अंतरावर गेले असता दोन अनोळखी तरुण कारजवळ आले. त्यांचा संशय आल्याने भाग्यश्री खोपडे यांनी कारचा दरवाजे लॉक केले. मात्र, त्यातील एकाने दगडाने चालक बाजूची काच फोडून लॉक उघडले, तर दुसर्याने कारचा दरवाजा उघडून भाग्यश्री यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र व सोन्याची चैन ओढून तोडली आणि दोघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.





