पक्षांतरबंदी कायद्यावर शुक्रवारी होणार महत्वाची चर्चा

नवी दिल्ली – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथे एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत सध्या ऐरणीवर आलेल्या पक्षांतरबंदी कायद्यावर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
देशातील विधानसभा आणि विधान परिषदांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक बिर्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या बैठकीच्या अजेंड्यावर पक्षांतरबंदी कायदा, सभागृहांच्या कामकाजातील अडथळे यांसारखे विविध विषय आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि गोव्यातील ताज्या राजकीय घडामोडींमुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा मोठ्या प्रकाशझोतात आला आहे.
त्यामुळे त्या मुद्द्यावर बैठकीतील चर्चेचा अधिक भर राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. तर, गोव्यातील कॉंग्रेस आमदारांचे बंड फसले. त्या घडामोडींमुळे आमदारांना अपात्र ठरवण्याचा विषय केंद्रस्थानी आला आहे.





