काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी का दिली, अमेठीतून का दिली नाही? जाणून घ्या समीकरण

Rae Bareli seat – लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या भाजपच्या बालेकिल्ल्यात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्याचा निर्णय झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
राहुल यांच्या आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) या पाच वेळा येथून खासदार राहिल्या आहेत. तर, गांधी घराण्याच्या जवळचे मानले जाणारे किशोरी लाल शर्मा (Kishori Lal Sharma) यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून (Amethi Lok Sabha seat) उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शर्मा हे गांधी परिवाराच्या अनुपस्थितीत या दोन्ही लोकप्रिय मतदारसंघांचा कारभार सांभाळत राहिले आहेत. दरम्यान, वायनाडमधून निवडणूक लढवणाऱ्या राहुल यांना अमेठीतून दुसऱ्या जागेवर का उतरवले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमेठीतून पराभवाची भीती सतावत आहे ?
अमेठीतून राहुल गांधींच्या विजयाबाबत काँग्रेसच्या मनात कुठेतरी साशंकता निर्माण झाली असावी, त्यामुळेच त्यांना रायबरेलीमधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे मानले जात आहे. खरे तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात होत्या. पण स्मृती इराणी यांनी गेल्या निवडणुकीत काॅंग्रसच्या बलाढ्य बालेकिल्ल्यापैकी एक असलेला अमेठी जिंकला. यानंतर त्या आपल्या लोकसभा मतदारसंघाला भेट देत राहिल्या आणि नुकतेच त्यांनी तिथे घर बांधले असून गृहप्रवेशही केला. या सर्व बाबींचा विचार करून केएल शर्मा यांना अमेठीतून तिकीट देण्याचा निर्णय झाला असावा.
केएल शर्मा समीकरणात फिट बसतात –
गांधी घराण्याशी जवळीक असलेले केएल शर्मा हे मृदुभाषी, साधे व्यक्तिमत्व, कार्यक्षम व्यवस्थापक आणि मीडियाच्या चकाकीपासून दूर राहणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. कार्यकर्त्यांना आपल्याच लोकांमधून काँग्रेसचा उमेदवार हवा होता, त्यामुळे तेही खूश असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. किशोरीलालही जातीय समीकरणात फिट बसतात. अमेठीमध्ये दलित (26 टक्के), मुस्लिम (20 टक्के) आणि ब्राह्मण (18 टक्के) यांचे प्राबल्य आहे. केएल शर्मा यांना जातीय समीकरणांचा फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसला वाटले असावे. किशोरीलाल शर्मा यांना प्रचाराच्या कामात पूर्ण साथ देण्याचे आश्वासन गांधी परिवाराने दिले आहे.
राहुल गांधी रायबरेलीतून का लढत आहेत?
अमेठीचे समीकरण समजले आहे, आता प्रश्न पडतो की राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक का लढवत आहेत ? खरेतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली ही एकमेव जागा होती जी काँग्रेसने यूपीमध्ये जिंकली होती. भाजपच्या झंझावातातही रायबरेलीचा बालेकिल्ला सुरक्षित राहिला, अशा स्थितीत यावेळीही राहुल यांच्या उमेदवारीचा फायदा आपल्याला होऊ शकतो, असे काँग्रेसला वाटत आहे. या भागातील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला ही वेगळी बाब आहे. पण गांधी घराण्याच्या नावाने, आणि तेही राहुल गांधींच्या नावाने, रायबरेलीची जनता त्यांना नक्कीच साथ देईल, असे काँग्रेसला कुठेतरी वाटत असावे.
आजी- आजोबांनीही रायबरेलीतून जिंकली निवडणूक –
राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधीच नव्हे तर त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांनीही रायबरली मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांनी तसेच त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांनी केले आहे. रायबरेलीचे लोक भावनिकदृष्ट्या नेहरू-गांधी घराण्याशी खूप जवळचे आहेत आणि त्यांनी पक्षाच्या अत्यंत वाईट दिवसातही सोडलेले नाही. अशा स्थितीत संपूर्ण उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी यापेक्षा सुरक्षित जागा क्वचितच असू शकते. त्यामुळेच या जागेवरून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे मानले जात आहे.





