Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील सात जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसकडून आज पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात ५७ उमेदवारांची नावे आहेत. दरम्यान, पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे.
मी पुणेकरांचा उमेदवार आहे. त्यामुळे याआधी मला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. आता याही निवडणुकीत पुणेकर मला भरभरून आशीर्वाद देतील, याची खात्री आहे. वाहतुकीपासून प्रदूषणापर्यंत अमली पदार्थांपासून वाढत्या गुन्हेगारीपर्यंत अनेक समस्या पुणेकरांसमोर उभ्या आहेत. महागाई, बेरोजगारी या समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत.
पण, भाजपने या प्रश्नांबद्दल काहीही केले नाही. गेली १० वर्षे इथे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पुणेकरांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला नाही. एकूणच राज्यात आणि देशात भाजपच्या कारभाराला, फसवणुकीला जनता कंटाळली आहे. ती या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपला आपली जागा दाखवून देईल, याची आम्हाला गॅरंटी आहे”. असं ते यावेळी म्हणाले.