लॉकडाऊनमुळे घरमालकासच अडकवले हनीट्रॅपमध्ये

50 लाखाची खंडणी मागणारा भाडेकरु जेरबंद
पुणे(प्रतिनिधी) – घर मालकास हनी ट्रॅपमध्ये अडकवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुस खंडणी व अंमलीपदार्थ विरोध पथकाने अटक केली आहे. आरोपीने पत्नीसोबत घरमालकाचे चोरीछुपे अश्लिल व्हिडीओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलींगचा प्रयत्न केला. यानंतर तडजोडीअंती 5 लाखची खंडणी घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
सलमान अहमद अली ( 26 , रा. चंदननगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वडगावशेरी येथील एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. आरोपीच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख 21 हजार, मेमरीकार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादीचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे. वडगावशेरी परिसरात त्यांची इमारत आहे. त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर तो रहातो तर, इतर खोल्या त्यांने भाड्याने दिल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील त्यांची एक खोली रिकामी झाल्यानंतर आरोपी हा त्यांच्याकडे भाड्याने राहण्यास आला होता.
कामाच्या निमित्ताने आरोपी व फिर्यादी यांची ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी हे इमारतीच्या पार्कींग परिसरात सकाळी दररोज फिरण्यासाठी येत होते. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने फिर्यादीला मेसेज करुन ओळख वाढवली. एकदा आरोपी पती घरी नसताना महिलेने फिर्यादीला घरी बोलविले. यानंतर त्याच्याबरोबर अश्लिल चाळे केले. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी खोली सोडून जात असल्याचे सांगितले.
“पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हयांमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग आहे. आरोपी वाडिया महाविद्यालयाजवळ हॉटेल असल्याचे सांगत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने पैशासाठी हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले.
यानंतर काही दिवसांतच आरोपीने फिर्यादीला फोन करुन सांगितले की, तुझे व माझ्या पत्नीच्या संबंधाची मला माहिती होती. त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही लावून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. या चित्रीकरणामुळे तुझी बदनामी होऊ शकते, त्यामुळे 50 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवितो. फिर्यादीने व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला होता.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांनी आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडीक, पोलीस हवालदार रमेश गरुड, सुनिल चिखले, विजय गुरव, फिरोज बागवान व प्रदीप गाडे यांच्या पथकाने सापळा रचला आणि 5 लाखची खंडणी घेताना त्यास रंगेहाथ पकडले.





