‘सगळ्यांसाठीच रोजी-रोटी महत्वाची असते’; सिध्दूंबाबत प्रश्नाला चरणजितसिंग चन्नी यांचे उत्तर

जालंधर – पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जालंधर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर कॉंग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिध्दू मात्र प्रचारापासून लांब आहेत. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले सिध्दू सध्या आयपीएची कॉमेंट्री करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी कोणाचाच प्रचार केला नाही.
त्याच अनुशंगाने सिध्दू यांची प्रचारात गरज असल्याच्या संदर्भात चन्नी यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की निवडणुकीत प्रत्येक मत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची गरज असते.
मी ज्या प्रमाणे पक्षासाठी काम करतो आहे त्याचप्रमाणे सिध्दूही त्यांचे काम करत आहेत. ते सध्या कॉमेंट्री करत आहेत. शेवटी प्रत्येकासाठी रोजी-रोटीचा प्रश्नही महत्वाचा असतो.
दरम्यान, चन्नी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार रिंकू यांना रिंगणात उतरवले आहे. रिंकु यांनी आम आदमी पक्षाकडून जालंधरची पोटनिवडणूक जिंकली होती. तर अकाली दलाने मोहिंदर सिंग कोपी यांना उमेदवारी दिली आहे.
आम आदमी पक्षाकडून पवनकुमार टीनू तर बहुजन समाज पक्षाकडून बलविंदर कुमार निवडणूक लढवत आहेत. पंजाबमधील सर्व १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.




