विकासदर मंदावण्याची शक्यता; स्टेट बँकेच्या अभ्यास अहवालातील माहीती

मुंबई – पहिल्या तिमाहीतील विकासदर समाधानकारक नव्हता. दुसर्या तिमाहितही विकास दर कमी होऊन 6.5% वर येण्याची शक्यता स्टेट बँकेच्या मासिक अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकासदर कमी होऊन 6.7% इतका झाला होता. हा विकासदर 15 तिमाहीच्या निचांकावर गेला होता.
त्यामुळे वार्षिक विकासदर 7% तरी भरतो की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. एकूण परिस्थिती पाहता सप्टेंबरअखेर संपणार्या दुसर्या तिमाहित विकासदर आणखी कमी होऊन 6.5% इतका होईल असे स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कर्जपुरवठा आणि ठेवी इत्यादी बाबींचा अभ्यास केल्यानंतर दुसर्या तिमाहित विकासदरावर निश्चित परिणाम होईल असे सांगण्यात आले. पुरेशी मागणी नसल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. असे समजले जाते की शहरी भागातील लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील क्रयशक्ती वर परिणाम झालेला नाही.
मात्र अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, या नकारात्मक बाबी केवळ काही महिन्यापुरत्या मर्यादित राहतील आणि डिसेंबरपासून अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी सकारात्मक होण्याची शक्यता आहे. दुसर्या तिमाहितील विकास दराची आकडेवारी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
हा विकासदर 6.5% इतका कमी होणार आहे. मात्र त्यानंतरच्या दोन तिमाहीत विकासदर वाढत राहण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागातील मागणी अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रोजगार आणि वेतन वाढत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री वाढत आहे. कर्जपुरवठ्यावर अधिक नियंत्रण आल्यामुळेही कर्ज पुरवठ्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे.





