Spicy Foods : जिभेला झणझणीत, पण पोटाला महागात.! रोज तिखट खाणाऱ्यांनी वेळीच सावध व्हा; मसालेदार पदार्थांमुळे शरीरावर काय परिणाम होतो…
तिखट पदार्थ म्हणजे शत्रू नाहीत; पण ‘जिभेची आवड’ आणि ‘शरीराची सहनशक्ती’ यामध्ये फरक असतो. त्यामुळे झणझणीत चवीचा आनंद घ्या, पण आपल्या शरीराला किती तिखट झेपतं याचा अंदाज घेऊनच प्रमाण ठरवा.

Spicy Foods : मिरचीचा ठसका, मसाल्यांचा झणका आणि तिखट पदार्थांची चव… भारतीय जेवण म्हटलं की या सगळ्यांशिवाय अनेकांना जेवणच अपूर्ण वाटतं! वडापाववर तिखट चटणी असो, मिसळ-पाववर झणझणीत रस्सा असो किंवा एखादी चमचमीत भाजी—तिखटपणा वाढला की चव आणखी खुलते, असं अनेकांना वाटतं. काही जण तर कितीही तिखट असलं तरी आवडीने खातात. पण जिभेला आवडणारा हा तिखटपणा पोटासाठीही तितकाच योग्य असेलच असं नाही.
मिरचीमध्ये असणारा कॅप्सायसिन हा नैसर्गिक घटक तिखटपणाची जाणीव निर्माण करतो. हा घटक शरीरातील उष्णता आणि वेदनेशी संबंधित रिसेप्टर्स सक्रिय करतो, त्यामुळे मिरची खाल्ल्यानंतर तोंडाला आणि घशाला जळजळ किंवा उष्णता जाणवते.
मात्र, तिखट पदार्थांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होतो. एखाद्याला झणझणीत जेवण सहज सहन होतं, तर दुसऱ्याला त्याच पदार्थामुळे छातीत जळजळ, पोटात अस्वस्थता किंवा शौचास त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शरीराला किती तिखट सहन होतं आणि कोणत्या पदार्थानंतर त्रास वाढतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
तिखट पदार्थ खाल्ल्यावर नेमकं काय होऊ शकतं?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थ किंवा कॅप्सायसिनचे सेवन केल्यास काही लोकांना पचनाशी संबंधित अस्वस्थता, छातीत जळजळ, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात.
१. छातीत जळजळ आणि ॲसिड रिफ्लक्स
तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर छातीत आग होणे, आंबट ढेकर येणे किंवा अॅसिड घशापर्यंत येण्यासारखं वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मसालेदार पदार्थ काही व्यक्तींमध्ये GERD किंवा ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे वाढवू शकतात.
२. पोटात जळजळ किंवा अस्वस्थता
खूप तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांना पोटात जळजळ, अस्वस्थता किंवा मळमळ जाणवू शकते. विशेषतः एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यास हा त्रास अधिक जाणवू शकतो.
३. जुलाब होऊ शकतात
काही व्यक्तींमध्ये जास्त कॅप्सायसिनमुळे पचनसंस्थेला त्रास होऊन जुलाब किंवा पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे तिखट जेवल्यानंतर वारंवार शौचास होणे किंवा पोट बिघडणे होत असेल, तर आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
४. तोंड आणि घशात जळजळ
मिरचीतील कॅप्सायसिनमुळे तोंडातील उष्णता जाणवणारे रिसेप्टर्स सक्रिय होतात. त्यामुळे मिरची खाल्ल्यानंतर ‘आग लागल्यासारखी’ जळजळ होणे ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया आहे. तिखटपणाची तीव्रता मात्र मिरचीचा प्रकार, प्रमाण आणि व्यक्तीच्या संवेदनशीलतेनुसार बदलू शकते.
प्रत्येकाला तिखटाचा त्रास होतो का?
ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तिखट पदार्थ खाल्ल्याने प्रत्येक व्यक्तीला ॲसिडिटी किंवा पोटदुखी होईलच असं नाही. काही लोकांना तिखट पदार्थ सहज सहन होतात, तर काही लोकांमध्ये त्याच पदार्थामुळे लक्षणे निर्माण होऊ शकतात.
तिखट आवडत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील तर ते पूर्णपणे बंद करण्याची गरज प्रत्येकाला असतेच असं नाही. मात्र, प्रमाण आणि शरीराची प्रतिक्रिया याकडे लक्ष द्या.
वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर अधूनमधून हलकी जळजळ होणे वेगळे; मात्र वारंवार छातीत जळजळ, आंबट पदार्थ घशात येणे, सतत पोटदुखी, उलट्या, गिळताना त्रास, रक्तमिश्रित किंवा काळसर शौच, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर केवळ तिखट कमी करून थांबू नका. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
थोडक्यात सांगायचं तर, तिखट पदार्थ म्हणजे शत्रू नाहीत; पण ‘जिभेची आवड’ आणि ‘शरीराची सहनशक्ती’ यामध्ये फरक असतो. त्यामुळे झणझणीत चवीचा आनंद घ्या, पण आपल्या शरीराला किती तिखट झेपतं याचा अंदाज घेऊनच प्रमाण ठरवा.






