मालाडमध्ये एकाच कुटुंबातील 12 जणांना जीवनदान

मुंबई – मालाडच्या आक्सा चौपाटीवर आलेल्या एका कुटुंबातील 12 जणांना वाचविण्यात यश आले आहे. मुंबई महापालिकाचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांच्या सहा जणांच्या टीमने या लोकांचे प्राण वाचविल्याने मोठी दुर्घटना टळली.
मुंबईचा मालाडच्या आक्सा चौपाटीवर आज संध्याकाळी 4:30 च्या सुमारास भुसावळमधून एक कुटुंब फिरायला आले होते.
या एकाच कुटुंबातील 12 लोक समुद्राच्या भरतीमध्ये उतरल्यामुळे बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आक्सा बीचवर तैनात असलेल्या लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांची 6 जणांची टीम यावेळी देवदूतासारखी धावून आली. समुद्राच्या भरतीमध्ये 12 लोकांना बुडताना पाहिल्यानंतर या टीमने लगेच समुद्रात उडी मारून सर्व 12 जणांना सुखरूप बाहेर काढले. लाईफ गार्डनी केलेल्या या 12 जणांचा सुखरूप रेस्क्यूमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली. 20 पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून जवळ बोट आली असता बोट बुडाली. यामध्ये दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.





