दिशा सालियन मृत्यूप्रकरण: आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली महत्वाची माहिती

Disha Salian death case : पीआर मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने राज्यासह देशात मोठी खळबळ उडवून दिली होती. तिच्या मृत्यूप्रकरणात अनेक आरोप करण्यात आले होते. तिची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. तसेच दिशाच्या मृत्यूप्रकरणात केलेले आरोप निराधार असल्याचे एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट मिळाली आहे.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत तिचा मृत्यू राजकीय षडयंत्र रचून दाबून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. दिशाचे वडील सतीश यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेला न्यायालयाने विरोध केला आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात संशयाला वाव नाही, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे.
९ जून २०२० रोजी मालाडमधील एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश यांनी आपल्या मुलीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी न्यायालयात तिने उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती.
याचिकेत केलेले आरोप निराधार
हे मृत्यू प्रकरण हाय प्राफाइल असल्याने २०२३ मध्ये एसआटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर CBI कडे चौकशी हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेला उत्तर देताना याचिकेत केलेले आरोप निराधार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे आता या मृत्यू प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : अमेरिका-व्हिएतनाम व्यापार करारामुळे बाजार तेजीत ; सेन्सेक्स २३० अंकांचा तर निफ्टीनेही २५५०० चा टप्पा ओलांडला





